नगर – नगर महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासाठी 5 कोटी, सावेडी येथील नाट्यगृहासाठी 5 कोटी निधी देण्याचे आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तसेच, महानगरपालिका आणि नगरपालिका व नगरपंचायतींनी रेंगाळलेली कामे आता गतीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटार योजना वेळेत मार्गी लावावी. ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींनी भुयारी गटार आणि पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले नाहीत, त्यांनी ते तत्काळ सादर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. विविध नगरपालिका आणि नगरपंचायतींकडून आलेल्या मागण्यांबाबत त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे नमूद केले.
अहमदनगर महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींसंदर्भात जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. भोसले यांनी सविस्तर सादरीकरण केले. अमृत अभियानाअंतर्गत पाणीपुरवठा योजना, पाणीपुरवठा संदर्भात अंतर्गत वितरण व्यवस्था, शहर भुयारी गटार योजना, सौरऊर्जा प्रकल्प, शहरात हरित पट्टे विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन आदींबाबतची सविस्तर माहिती त्यांनी दिली. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे तसेच महानगरपालिकेतील इतर पदाधिकारी यांनीही विकासकामांसंदर्भात विविध मुद्दे मांडले.
नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) योजनेतील विविध प्रकल्प, त्याची सद्यस्थिती आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणार्या आवश्यक बाबी, यांची यावेळी त्यांनी माहिती दिली.
आमदार आशुतोष काळे, आ. लहू कानडे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, शशिकांत गाडे, मनोज कोतकर, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, माजी महापौर सुरेखा कदम यांच्यासह संबंधित नगरपालिका, नगरपंचायतींच्या पदाधिकार्यांनी यावेळी विविध विकासकामांसंदर्भात शिंदे यांच्याकडे मागणी केली.
या बैठकीस उपायुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे यांच्यासह मनपातील विविध विभागप्रमुख, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.