आळंदी – रॉबिन हूड व सक्षम दिव्यांग संस्था, प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या हस्ते जागतिक महिला दिना निमित्त दिव्यांग महिलांना साडीचोळी, युवकांना पोषाख तसेच रेशनिंग अन्नधान्य किटचे वाटप आळंदीत उत्साहात करण्यात आले.
आळंदी पंचक्रोशीतील दिव्यांगांना विशेष कायदा व विशेष योजना या बाबतच्या योजनांची माहिती खेड तालुका सक्षम अध्यक्ष विजय पगडे, आळंदी शहराध्यक्षा व पुणे जिल्हाध्यक्षा अर्चना घुंडरे, सचिन वाघमारे यांनी दिली. दिव्यांग योजना व कायदा प्रत्येकी वेगवेगळ्या विषयावर दिव्यांग बांधवास विस्तृत माहिती देत जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी अर्चना घुंडरे पाटील, उपाध्यक्ष राजेश बेंद्रे, सचिव सचिन वाघमारे, शिवशंकर मुंडे, गजानन गवळी, ज्ञानेश्वर माळी, अभिनव लोखंडे अंबादास बेंद्रे आदी उपस्थित होते.
या उपक्रमात अनेक दिव्य बांधवांना संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना, एस. टी. स्मार्ट कार्ड, रेल्वे पास, युनिक कार्ड, अपंग सर्टिफिकेट मिळाले नाही, त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. घरकुल योजना, पाच टक्के निधी मदत अशा योजना पासून वंचित राहिलेल्या दिव्यांगांना यापुढील काळात योजनेचा लाभ देण्यासाठी प्राधान्य देऊन कोणीही लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे शहराध्यक्ष अर्चना घुंडरे पाटील यांनी सांगितले.
दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करत येत्या 15 दिवसांच्या आत सर्वांनी सर्वांचे शासकीय योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. दिव्यांग विशेष योजनेचा लाभ सर्वाना मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील असे घुंडरे पाटील यांनी सांगितले. आळंदी पंचक्रोशीतील दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किट व महिलांना, युवकांना पोशाख वाटप करण्यात आले.