महाळुंगे इंगळे – पुष्पा सिनेमा स्टाइलने गोमांस वाहतूक करणारी टोळी जेरबंद करण्यात महाळुुंगे पोलिसांना यश आले आहे. चाकण-तळेगाव रस्त्याने रात्रीचे वेळी अवैधरित्या गोमांस वाहतूक करून मुंबई-ठाणे परिसरामध्ये गोमांस पुरवले जात असल्याचे प्राप्त माहितीद्वारे महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळिग व स्टाफ यांना गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे सूचना दिल्या होत्या.
शुक्रवारी (दि. 18) रात्री सव्वादोनच्या सुमारास खालुंब्रे गावच्या हद्दीतील एचपी चौकांमध्ये नेमण्यात आलेल्या नाकाबंदीवेळी सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळिग व सहकाऱ्यांनी एका ट्रकला थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने ट्रक न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्या ट्रकचा पाठलाग करून काही अंतरावरील जोपदेवी पेट्रोल पंपाजवळ ट्रक थांबविला. ट्रकची पाहणी केली असता आतील बाजूस पाण्याचे टॅंकर प्रमाणे पत्र्याची टाकी बनवण्यात आली होती. टाकीमध्ये मांसाचे तुकडे आढळून आले.
या गुन्ह्यात मोहम्मद शहीद मोहम्मद हरून (वय 35, रा. मालेगाव) आणि अकलन खान अनिस खान (वय 22, रा. जुना आझादनगर, मालेगाव) यांना अटक करण्यात आली. त्यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपींकडून सहा लाख रुपये किमतीचे दोनशे किलो वजनाचे गोमांस, दहा लाख रुपये किंमतीची ट्रक जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, दत्तात्रय वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक किरण शिंदे, अंमलदार राजू राठोड, अमोल बोराटे, तानाजी गाडे, किशोर सांगळे, संतोष काळे, शिवाजी लोखंडे बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे, शंकर आडे यांनी केली.