पुणे – जगभरात अयोध्येतील राम मंदीरात होणार्या प्रभू श्री रामांच्या रामलल्ला रूपातील मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. हा सोहळा घरोघरी साजरा करण्यासाठी नागरीक सरसावले असतानाच कसबा विधानसभा मतदारसंघात घरोघरी आमदार रविंद्र धंगेकर यांनी तब्बल ५० हजार दिव्यांचे वाटप केले आहे. या शिवाय, हे दिवे घरी लावावेत अशी भावनिक सादही धंगेकरांनी नागरिकांंना घातली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही कसबा मतदारसंघात असताना भाजपपेक्षा या मतदारसंघात काॅंग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेल्या धंगेकरांनीच क़सबा विधानसभा मतदारसंघात अयोध्या सोहळयासाठी आघाडी घेतल्याचे चित्र असून नागरिकांकडूनही त्यांच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे. अयोध्या सोहळयासाठी आता पर्यंत धंगेकरांच्या वतीने मतदारसंघात दिपोत्सव, महाआरती, कार सेवकांचा सन्मान, फटक्यांची आतिषबाजी, घरोघरी दिव्यांचे वाटप असे कार्यक्रम सुरू आहेत.