Shoaib Malik : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पाकिस्तानी क्रिकेट पती शोएब मलिक याने तिसऱ्यांदा विवाह केला आहे. त्याने अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वीच त्याचे पहिले लग्न केले होते. घटस्फोट घेतल्यानंतर त्याने भारतीय टेनिस स्टारशी लग्न केले होते. मागील काही दिवसांपासून शोएब आणि सानिया यांच्यात घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. यातच आता त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यापूर्वी सानिया मिर्झाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, घटस्फोट घेणे खूप कठीण आहे आणि लग्न करणे देखील खूप कठीण आहे. त्यानंतर कदाचित शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला असल्याचे संकेत मिळत होते. गेल्या एक वर्षापासून अशा अफवा सुरू होत्या की दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही आणि ते वेगळे होऊ शकतात, ज्याला आता पुष्टी मिळाली आहे.
शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचे लग्न १२ एप्रिल २०१० रोजी झाले होते, तेव्हा भारतात या मुद्द्यावरून बराच वाद झाला होता. या दोघांचे लग्न हैदराबादमध्ये झाले होते आणि त्यांना 2018 साली एक मुलगाही झाला होता. पण कोरोनानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि दोघेही वेगळे राहत होते, काही काळापूर्वी सानिया आणि शोएबने एकत्र पाकिस्तानी शो देखील होस्ट केला होता.
कोण आहे सना जावेद?
41 वर्षीय शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. सना जावेद ही पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री आहे आणि तिचे हे दुसरे लग्न आहे. सना जावेद याआधी पाकिस्तानी गायक ओमर जसवालसोबत रिलेशनशिपमध्ये होती, मात्र आता तिने शोएब मलिकसोबत लग्न केले आहे. सना आणि उमरनेही इन्स्टाग्रामवरून त्यांचे सर्व जुने फोटो हटवले आहेत. सनाचे पहिले लग्न 2020 मध्ये झाले होते, तर आता तिचे दुसरे लग्न 2024 मध्ये झाले आहे.