पुणे – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासंदर्भात सतत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी विभागातील प्रलंबित कामांची तपासणी करण्यासाठी 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागातील कामकाजाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.
शिक्षण विभागातील स्व मान्यता यू-डायस प्रणाली, शिक्षकांची थकीत बिले, आणि एकूणच कारभार याबद्दल गेल्या काही महिन्यापासून वारंवार तक्रारी येत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील वाद, त्याचबरोबर प्रलंबित कामे, शिक्षक आणि संस्थांच्या तक्रारी यामुळे हा विभाग चर्चेत आला आहे. त्याबाबत शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांना सक्षम भेटून सर्व प्रकार कथन केला.
मात्र, त्यानंतर शिक्षण विभागाची चार तास बैठक घेतली. त्यानंतर सर्व कार्यालयाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चव्हाण यांच्या आदेशानुसार शुक्रवारी सामान्य प्रशासनाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी 12 जणांची नियुक्ती करत शिक्षण विभागातील सर्व कार्यालयाच्या दप्तर तपासणीस सुरुवात केली आहे. आज सायंकाळपर्यंत ही तपासणी सुरु राहणार आहे. त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर रमेश चव्हाण हे काय निर्णय घेणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.