अणे येथे दोन वेळा केला जाळी तोडून पोल्ट्रीवर हल्ला
पिंजरा लावण्याची ग्रामस्थांचा मागणी
बेल्हे (वार्ताहर) – अणे (ता.जुन्नर) येथे जैनूद्दिन फकीर अहमद जमादार यांच्या पोल्ट्रीवर शुक्रवार (दि.17) व रविवार (दि.19) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला करून सुमारे पाचशे कोंबड्यांचा फडशा पडला आहे. पोल्ट्रीच्या छताचा सिमेंटचा पत्रा तोडून बिबट्याने पोल्ट्रीत प्रवेश केला. कोंबड्यांचा फडशा पाडून बिबट्या पोल्ट्रीची जाळी तोडून पसार झाला. पोल्ट्री वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याचा हॉल फसला.या हल्ल्यामुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बेल्हे वनपाल दत्ता फापाळे यांनी या घटनेचा पंचनामा केला असून जमादार यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की आणे येथील गट नंबर 872 मध्ये जैनुद्दीन फकीर अहमद जमादार हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून भाडेतत्त्वावर ती पोल्ट्रीचा व्यवसाय करतात. सावळेराम ठकाजी गायकवाड यांची हे पोल्ट्री फार्म असून यावर बिबट्याने हल्ला करून 500 कोंबड्या मृत तर 80 ते 100 कोंबड्या जखमी झाल्या आहेत.
जमादार यांचे 80 हजार ते 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.यांचे येथे तीन शेड असून एक महिन्या पेक्षा जास्त दिवसाचे पक्षी झाले आहेत. पाळीव प्राणी व पशुपक्ष्यांवर होणारे बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे.सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते,दीपक आहेर,माजी सरपंच शेतांबरी आहेर,माजी सरपंच किशोर आहेर, पेमदराचे सरपंच रंगनाथ बेलकर यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.