प्रशांत जाधव
सातारा – तो एकटाच अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत स्वारगेट (पुणे) पोलीस ठाण्यात आला… त्याचे वय अवघे सतरा वर्ष… केवळ “अभिषेक’ हे नाव तो सांगत होता. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांना शोधून काढणे हे पोलीस कर्मचाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी पुण्यातील प्रत्येक गल्ली पिंजून काढली. मात्र, हाती काहीच लागत नसल्याने पोलिसांनी “व्हॉट्स ऍप’ ग्रुपवरवर मुलाचे छायाचित्र व त्यांचा संपर्क नंबर व्हायरल केला. आणि काही वेळातच हरवलेला अभिषेक आईवडिलांच्या कुशीत पोहचला.
हा सर्व प्रकार आहे पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यातील. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या पोलीस ठाण्यातील सगळे कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असतानाच एक मळकट कपडे अंगावर असलेला मुलगा पोलीस ठाण्याच्या आवारात आला आणि बाहेर उभ्या असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम वीर यांना मिठ्ठी मारून रडू लागला.
“साहेब, काहीही करा मला माझ्या आईवडिलांकडे सोडा’ अशी विनवणी करू लागला. वीर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्याला जेवण देण्यासाठी वीर यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र, तो खायला नको आईवडिलांकडे सोडा असे म्हणू लागला. त्यानंतर पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध केली तरीही अभिषेकच्या नातेवाईकांचा शोध लागत नव्हता.
अखेर पुणे पोलिसांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर अभिषेकचा फोटो व पोलिसांचा संपर्क क्रमांक सर्वत्र पाठवण्यात आला. तो मेसेज साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना आल्यानंतर त्यांनी तातडीने तो मेसेज साताऱ्यातील पोलिस जनसंपर्क या ग्रुपवर व्हायरल केला. त्यावर साताऱ्यातील पत्रकारांनी अभिषेक हरवला असल्याची पोस्ट त्याच्या एका नातेवाईकांनी सोशल माध्यमांवर केलेली माहिती टाकली.
अन् खऱ्या अर्थाने अभिषेकचा कुटुंबाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. पुणे पोलिसांनी दिलेला फोटो अन् घोरपडे यांनी सोशल मीडियावर टाकलेला फोटो एकच असल्याने, साताऱ्यातील माध्यम प्रतिनिधींनी तातडीने अभिषेकचे चुलते संजय घोरपडे यांना माहिती देत, तातडीने पुण्याला जाण्याबाबत सुचवले. घोरपडे कुटुुंब रविवारी रात्री दहा वाजता पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मध्यरात्री हे सगळे स्वारगटे पोलीस ठाण्यात पोहचले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पहाटे पाच वाजता अभिषेकचे मूळ गाव असलेल्या मत्यापूर (ता. सातारा) येथे पोहचले.
घटनाक्रम
शुक्रवार, दि. 17 रोजी अभिषेक इस्लामपूर येथून बेपत्ता.
शनिवार, दि. 18 रोजी अभिषेकच्या अपहरणाचा गुन्हा इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल.
रविवार, दि. 19 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अभिषेक पुणे रेल्वे स्टेशनवर आला.
सहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर.
बराच वेळ शोध घेतल्यानंतर नातेवाईक मिळत नसल्याने आठ वाजता सोशल मीडियावर संदेश पाठवला.
साडेआठ वाजता साताऱ्यातील व्हॉटस्ऍप ग्रुपवर पुणे पोलिसांचा मेसेज तेजस्वी सातपुतेंनी टाकला.
पावणे नऊ वाजता त्याच मेसेजच्या आधारे साताऱ्यातील पत्रकारांचा नातेवाईकांना फोन
मध्यरात्री नातेवाईक पोलीस ठाण्यात हजर.
पहाटे अभिषेक नातेवाईकांसह मूळ गावी सुखरूप पोहचला.
…म्हणून सोडले होते घर
अभिषेक हा मूळचा मत्यापूर (ता. सातारा) येथील आहे. त्याचे वडील रवींद्र घोरपडे हे ठाणे जिल्हा पोलीस दलात नोकरीस आहेत. त्यांनी अभिषेकला बारावी विज्ञान शाखेच्या शिक्षणासाठी इस्लामपूर येथील नामवंत शिक्षण संस्थेत घातले होते. मात्र, त्याला विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम झेपत नसल्याने त्याने दि. 17 जानेवारीला घर सोडले होते.