नवी दिल्ली – भारतीय ऑलिम्पिक संघटनेतील (आयओए) वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (आयएचएफ) अध्यक्षपदी नरेंद्र बात्रा यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी व्यक्त केल्यानंतर वाद सुरू झाला असून याबाबतची तक्रार आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडेही (आओसी) गेली आहे.
मित्तल यांनी बात्रा यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे पत्र समितीला पाठवले होते. बात्रा यांनी अत्यंत चुकीची माहिती दिली असून संघटनेच्या नियमांतील 7.2 या तरतुदीनुसार त्यांची नियुक्ती वैध ठरू शकत नाही, असे मित्तल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. बात्रा मुळात हॉकी इंडियाचे पद भूषवत असून या नियमाच्या आधारे ते एकाच वेळी दोन पदे मिळवू शकत नाहीत. 2016 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे पद मिळावे यासाठी हॉकी इंडियाच्या पदावरून राजीनामा देत बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर एका वर्षातच त्यांचे नाव पुन्हा एकदा हॉकी इंडियाच्या सदस्यपदासाठी पुढे घेतले गेले. ते जर पदावरून बाजूला गेले होते तर ते हॉकी इंडियाच्या कार्यकारी समितीत अद्याप कसे राहू शकतात, अशी विचारणाही मित्तल यांनी केली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना बात्रा यांनी योग्य वेळी मित्तल यांच्या वक्तव्यांना स्पष्टीकरण देईन, असे सांगितले आहे. देशात करोनाचा धोका वाढत असताना माझ्या कुटुंबातील काही व्यक्तींनाही याची लागण झालेली होती. सध्या याच कारणाने मी देखील घरातच विलगीकरण करून राहात आहे. विलगीकरणाचा कालावधी संपल्यावर मी मित्तल यांना उत्तर देईन, असे बात्रा यांनी सांगितले.