मुंबई : तब्बल दोन वर्षांनंतर राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केलेल्या खळबळजनक विधानांमुळे हे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर राणे पिता-पुत्र यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावले आहे.
Disha Salian death case | Malvani Police Station summons Union Minister Narayan Rane to record a statement on March 4, 11 am, and BJP MLA Nitesh Rane to appear at 11 am on March 3
— ANI (@ANI) March 2, 2022
दिशाच्या मृत्यूनंतर नारायण राणे, त्याचे पुत्र नितेश राणे यांनी दिशाच्या मृ्त्यूबाबत आरोप केले होते. त्यामुळे सालियन कुटुंबीयांची बदनामी झाल्याबाबत त्यांनी दोन वेळा मालवणी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. १९ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.
मालवणी पोलिसांनी नारायण राणेंना समन्स बजावले आहेत. ३ मार्च रोजी अर्थात गुरुवारी नारायण राणेंना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंनी केलेल्या दाव्यांबाबत त्यांचा जबाब यावेळी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नारायण राणेंसोबतच नितेश राणे यांना देखील पोलिसांनी पाचारण केलं असून ४ मार्च रोजी नितेश राणे यांना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे.