तळेगाव ढमढेरे -करोना आपत्ती निवारण समितीच्या बैठकीमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह विविध विषयांचे ठराव मंजूर करून संबंधित विभागांना पत्र पाठवून कार्यवाही करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष व तलाठी डी. एस. भराटे यांनी सांगितले.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेसाठी गावपातळीवर कृती समिती गठीत करण्यात आली आहे. करोना आपत्ती निवारण समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष भराटे व समितीचे सदस्य कैलास लोहार, आर. के. चौधरी, अविना आल्हाट, महिला बचत गटाच्या अध्यक्षा आरती भुजबळ, शैला भुकने, पोलीस पाटील पांडुरंग नरके, ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर उपस्थित होते.
यावेळी जीवनावश्यक किराणा दुकान, रेशन धान्य दुकान, भाजीपाला-दूध विक्री, वैद्यकीय औषधे (मेडिकल), दवाखाने पूर्णवेळ सुरू ठेवणे, गुजर प्रशालेसमोर, विठ्ठलवाडी रस्ता, न्हावरा रस्ता याठिकाणी बॅरिकेट लावणे, बाहेरून येणाऱ्या लोकांची यादी करणे, या व्यक्तींना 14 दिवस होम क्वारंटाइन करणे, खासगी दवाखाने बंद करू नयेत,भाजीपाला मार्केटपर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांना परवाना देणे, परिसरात कचरा टाकू नये, सफाई करावी, विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस स्टेशनने कडक कारवाई करावी, गरजूंना रेशन दुकानातून धान्य द्यावे.
यासाठी ग्रामपंचायतमध्ये नोंद करावी, भविष्यात विलगीकरण कक्ष म्हणून कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक शाळा ताब्यात घेणे, पॅरा मेडिकल स्टाफ – डॉक्टर – नर्स गरज पडल्यास घेणे, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांनी आरोग्य खात्यास मदत करणे, अीा महत्त्वपूर्ण ठराव बैठकीत करण्यात आले. याबाबत त्वरित अंमलबजावणी करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष भराटे यांनी सांगितले.