पिंपरी – संभाव्य पूर परिस्थितीतील आपत्तीकाळात कोणतीही घटना घडल्यास परिस्थिती हाताळण्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. 8) रात्रीपासून पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे पवना नदीपात्रातील पाणी पातळी वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर पूरस्थिती उद्भवल्यास पुढील नियोजन करण्यात आले आहे.
त्यासाठी आपत्ती काळात सेवा देणाऱ्या शहरातील संस्था, सर्पमित्र, आरोग्य विभाग, वैद्यकीय, जलनि:स्सारण, स्थापत्य, अग्निशमन, सुरक्षा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन आदी विभांगाच्या प्रमुखांना तत्पर राहण्यास सांगितले आहे.
पूर परिस्थिती कालावधीत घटनास्थळावर पोहोचून योग्य निर्णय घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. पूर परिस्थिती सहजतेने हाताळण्यासाठी सर्व विभाग अंतर्गत समन्वय ठेवण्यास सांगितले आहे. पाऊस पडत असताना पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झाल्यांनतर लगेचच सर्व यंत्रणा कार्यान्वित होणार आहेत, असे ढाकणे यांनी सांगितले.
सुविधा
-क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विभागात सुविधा.
-शाळा, समाजमंदिरांमध्ये निवासाची व्यवस्था.
-खाद्यपदार्थांचे किट तयार.
-रुग्णालये सज्ज.
-अग्निशमन विभाग व इतर आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज.
-अग्निशमन दल, मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष 24 तास सज्ज.
-पूरस्थिती किंवा मदतीसाठी नंबर ः 8888006666