भोपाळ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यांनी या यंत्रांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली. ते म्हणाले की आपण टाकलेले मत योग्य ठिकाणी गेले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅट मशिनमधून ज्या स्लीपा मिळतात त्या मतपेटीत स्वतंत्रपणे टाकून त्यांची मोजणी केली जावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र व व्हीव्हीपॅट यांच्यात कशी तफावत होते याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले.
या स्लिप्सची मोजणी करूनच निवडणुकीचे निकाल जाहीर केले जावेत, असे त्यांनी नमूद केले. ईव्हीएमचा वापर फक्त भारत, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया, व्हेनेझुएला आणि ब्राझीलमध्ये निवडणुका घेण्यासाठी केला जात आहे, असा दावा त्यांनी केला. भारतात सॉफ्टवेअर हॅक केले जाऊ शकते असाआरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर सिंग यांनी अनेक प्रसंगी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, जर मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेणे शक्य नसेल, तर व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) स्लिप मतदारांना द्याव्यात आणि त्यांची पडताळणी केल्यानंतर त्यांना मतपेटीत टाकण्याची परवानगी द्यावी, असे ते म्हणाले.
या व्हीव्हीपीएटी स्लिप्सची मोजणी करून निवडणुकीचे निकाल जाहीर केले जावेत,अशी मागणी त्यांनी केली. जर ईव्हीएमचे हे बटण जास्त काळ दाबले गेले तर त्यात अनेक मतांची नोंद होते आणि लोकांनी ज्या चिन्हाला मतदान केले आहे त्या चिन्हाला नाही, असा दावा त्यांनी केला. ईव्हीएम मध्ये कसा घोळ होतो याचे प्रात्यक्षिकही दिग्विजयसिंह यांनी पत्रकारांना दाखवले.