परभणी – राज्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्व्हेत ऐन परीक्षांच्या काळात शिक्षकांना अडकवण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सर्व्हेचे काम हे ८० टक्के शिक्षकांना देण्यात आल्याने ऐन परीक्षांच्या हंगामात अख्खी शिक्षण व्यवस्थाच सलाईनवर आली आहे.
अचानक सरकारचा आदेश धडकला अन् राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमधील ८० टक्के शिक्षकांना सर्व्हे करण्याच्या कामाला लावण्यात आले. जर हे काम नाही केले तर याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवून कारवाई केली जाईल अशी तंबी ही देण्यात आली. त्यामुळे सर्व शिक्षक शाळेतील काम सोडून सर्व्हेच्या कामाला लागले. ज्यामुळे तिकडे शाळांमधील सर्व नियोजनच बिघडून गेले.
राज्य शासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या या मराठा सर्वेक्षण प्रक्रियेमध्ये ३६ जिल्हे, २७ महापालिका आणि ७ कॅन्टॉन्मेंट बोर्डचा समावेश आहे. सर्वेक्षणासाठी राज्यातून साधारण १ लाख २५ हजारांपेक्षा अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल यंत्रणेनेही सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या कोणत्या परीक्षा सुरु?
दहावी बारावीच्या सराव परीक्षा सुरु आहेत. पुढच्या आठवड्यात प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होणार. शालेय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षा, पाचवी ते नववीच्या द्वितीय सत्राची परीक्षा एप्रिल महिन्यात, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाचवी ते नववीच्या घटक चाचण्या आहेत.