शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्न मिटला, सुप्रिया सुळे अभिनंदन..!

मुंबई – महाराष्ट्रात शनिवारी सकाळी राजकीय भूकंप झाला. भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन सत्तास्थापन केली. राजभवनात शपथविधीही पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील पवार समर्थक आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार यांनी शरद पवार यांना दगा देत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला,अशी जोरदार टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केली. या दरम्यान, राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. अशा वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी एक वेगळेच ट्विट केले आहे.

“राष्ट्रवादीचे ५४ पैकी ५३ आमदार शरद पवार यांच्यासोबत राहतील. अजित पवार एकटे पडतील. शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटला. सुप्रिया सुळे, आपले अभिनंदन!”, अशा आशयाचे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

शरद पवार यांचे राजकीय वारसदार अजित पवार की सुप्रिया सुळे हा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अस उत्तर बऱ्याचदा देण्यात येत. त्यामुळे विविध विषय लक्षात घेत अजित पवार यांनी अचानक भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.