माउंट माँगिन्यूई : न्यूझीलंड विरूध्द इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये इंग्लंड संघ पराभवाच्या छायेत आहे. चौथ्या दिवसअखेर अद्याप २०७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या इंग्लंड संघाची दुस-या डावात ३ बाद ५५ अशी बिकट अवस्था झाली आहे.
A record partnership between Mitchell Santner and BJ Watling powered New Zealand to 615/9d, before the hosts' spinner reduced England to 55/3 at the close of play on day four.#NZvENG report 👇https://t.co/ZZjWCCN1v4
— ICC (@ICC) November 24, 2019
कालच्या ६ बाद ३९४ पुढे खेळताना आज न्यूझीलंडने पहिला डाव ९ बाद ६१५ वर घोषित केला. बीजे वॅटलिंगने २०५ आणि मिचेल सँटनरने १२६ धावा केल्या. वॅटलिंगचे कारकिर्दीतील हे पहिले व्दिशतक तर सँटनरचे पहिले शतक ठरले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी २६१ धावांची भागिदारी केल्याने न्यूझीलंडने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून गोलंदाजीत सॅम करनने सर्वाधिक ३ तर बेन स्टोक्स व जैक लीचने प्रत्येकी २ गडी बाद केले. जोफ्रा आर्चर आणि जो रूटने प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुस-या डावात इंग्लंडने सावध सुरूवात केली. सलामीवीर राॅरी बर्न्स आणि डोमिनीक सिबली यांनी पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागिदारी केली पण त्यानंतर मिचेल सँटनरने इंग्लंडला तीन झटके दिल्याने त्यांची ३ बाद ५५ अशी अवस्था झाली. राॅरी बर्न्स ३१, डोमिनिक सिबली १२ तर जॅक लीच शून्यावर तंबूत परतले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जो डेनली नाबाद ०७ धावांवर खेळत होता. डावाने पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला आणखी २०७ धावांची आवश्यकता आहे.
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड : पहिला डाव : सर्वबाद ३५३.
न्यूझीलंड : पहिला डाव : २०१ षटकांत ९ बाद ६१५ घोषित.
इंग्लंड : दूसरा डाव : २७.४ षटकांत ३ बाद ५५( जो डेनली खेळत आहे ०७, मिचेल सँटनर ३-०६).