मंचर (प्रतिनिधी) – सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या डाव्या पायावर व हातावर शनिवारी (दि.३०) पुणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची फोन करून विचारपूस केली. वळसे पाटील यांना भेटण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे हॉस्पिटलला आल्या होत्या. त्यांनी कन्या पूर्वा वळसे पाटील यांच्याबरोबर चर्चा केली.
पुणे येथील निवासस्थानी वळसे पाटील पाय घसरून जमिनीवर पडले होते. त्यांच्या डाव्या खुब्याला व हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने औंध परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. तशी माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
मात्र, आता दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना फोन केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एखादी राजकीय व्यक्ती जर आजारी पडली तर त्या व्यक्तीच्या सुख दुःखात सहभागी होण्याची पद्धत आहे. त्यातून राजकीय मतभेद बाजूला ठेवत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.
जवळपास १५ ते वीस मिनिटं त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. वळसे पाटील यांना डॉक्टरांनी महिनाभर आरामाचा सल्ला देखील दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही घटना घडली आहे. त्यामुळे वळसे पाटील हे प्रचारासाठी दाखल होणार का ? अशा चर्चाही आता रंगू लागल्या आहेत