नगर – शहरातील जीपीओ चौकात संशयित बनावट डीझेलवर छापा टाकल्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी नाशिकच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना शुक्रवारी प्राप्त झाला आहे. त्यात हे डीझेल बनावट होते की खरे याबाबत स्पष्टता आहे. अहवालामध्ये काय आहे, हे लगेच उघड करता येणार नाही, तो तपासाचा भाग आहे. योग्य वेळ आल्यावर सर्व बाबी समोर येतीलच असे, अधीक्षक पाटील यांनी सांगत अहवालात काय आहे ते सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे अहवालात काय आहे. याबाबत नगर जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे.
तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने जीपीओ चौकात संशयीत बनावट डीझेल पकडले होते. या डीझेलचे नमुने नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी पोलीस अधीक्षक यांना मिळाला आहे. या डीझेल प्रकरणात छापा टाकलेल्या पथकात सहभागी व प्रत्यक्ष छाप्याच्या वेळी हजर असलेल्या 8 कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. सुरुवातीला संशयित बनावट डीझेल प्रकरणाचा तपास हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे होता.
त्यावेळी एक आरोपी अटकेत होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे निलंबन झाल्यानंतर हा तपास पाटील यांच्याकडून काढून घेत शहर विभागाचे उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे देण्यात आला. त्यांच्याकडून तपास सुरु असताना अचानकपणे त्यांना तपासाचा अनुभव नसल्याचे कारण पुढे करत हा तपास श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक संदीप मीटके यांच्याकडे देण्यात आला आहे. मिटके यांच्याकडे तपास आल्यानंतर त्यांनी डीझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगत शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख यांना अटक केली.