धोनीवरची टीका गंभीरलाच भोवली

नवी दिल्ली: जागतिक क्रिकेटमध्ये अनेकदा संघातील स्थान गमावून बसलेले खेळाडू विनाकारण चर्चेत राहण्यासाठी आपल्या अपयशाचे खापर अन्य कोणावर फोडतात हे काही नवीन नाही. असाच खेळ क्रिकेटपटू गौतम गंभीरने खेळला, मात्र त्यात त्यालाच टीकेचा धनी व्हावे लागले.

2011 साली भारतीय क्रिकेट संघाने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. या सामन्यात गंभीरने 97 धावांची खेळी केली होती, मात्र याच सामन्यात माझे शतक पूर्ण झाले असते. मात्र केवळ माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीमुळेच शतक होऊ शकले नाही असा थेट आरोप गंभीरने केला. अखेरच्या षटकापर्यंत सामन्याचे पारडे दोन्ही संघांकडे झुकत होते, मात्र, धोनीने नुवान कुलसेकराच्या चेंडूवर षटकार फटकावत भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आणी संपूर्ण देशवासीयांची स्वप्नपूर्ती केली.

या सामन्यात गंभीर 97 धावांवर बाद झाला पण त्याने यासाठी धोनीला लक्ष्य केले. मात्र, झाले उलटेच आता सोशल मीडियावर गंभीरवरच टीका होऊ लागली आहे. खरेतर शतकासाठी केवळ 3 धावा पाहिजेत हे धोनीने गंभीरचे शतक पूर्ण व्हावे याचसाठी केवळ आठवण करून देण्यासाठी सांगितले होते. शतकाच्या इतक्‍या जवळ असताना आणि सामना भारताच्या बाजूने झुकलेला असताना केवळ उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात गंभीर थिसेरा परेराच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला, ही त्याची स्वतःची चूक होती.

त्यामुळे गंभीरच्या या वक्तव्यावर तोच टीकेचा धनी बनला आहे. मी 97 धावांवर बाद झालो. मी त्यावेळी माझ्या वैयक्तिक धावसंख्येसाठी नव्हे, तर संघाला जिंकून देण्यासाठी खेळत होतो. मला आजही लक्षात आहे की जेव्हा षटक संपले तेव्हा मी आणि धोनी खेळपट्टीवर होतो. माझे शतक पूर्ण होऊ शकते अशी आठवण मला धोनीने करून दिली. त्याच्या सल्ल्यामुळे मला माझ्या शतकाची ओढ लागली व मी सावध खेळू लागलो आणि त्यातच बाद झालो. धोनीने आठवण करून दिली नसती, तर माझे शतक पूर्ण झाले असते, असे गंभीरने मुलाखतीत सांगितले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.