पाकिस्तानकडून तीन महिन्यांत तब्बल 950 वेळा शस्त्रसंधी भंग

नवी दिल्ली: पाकिस्तानी सैनिकांनी अवघ्या तीन महिन्यांत तब्बल 950 वेळा शस्त्रसंधी भंग करत नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत भारतीय हद्दीत मारा केला. त्यामुळे जम्मू-काश्‍मीरबाबत भारताने उचललेल्या धडक पाऊलांनंतर पाकिस्तान आणखीच बिथरल्याचे स्पष्ट झाले.

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे पाकिस्तानी आगळिकींची माहिती दिली. पाकिस्तानी सैनिकांनी चालू वर्षी ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत सातत्याने शस्त्रसंधी भंग केला. त्या कालावधीत 3 भारतीय जवान शहीद झाले. तर 7 जवान जखमी झाले. संबंधित कालावधीत पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगतही थैमान घातले. त्यांनी जम्मू विभागात आयबीलगत 79 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

पाकिस्तानी माऱ्याला भारतीय सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते, असेही नाईक यांनी नमूद केले. जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय भारताने 5 ऑगस्टला घेतला. त्यामुळे काश्‍मीरवर वक्रदृष्टी ठेवणारा पाकिस्तान अस्वस्थ झाला. त्यातून त्या देशाने नापाक कारवाया वाढवत शस्त्रसंधी भंगाचे सत्रच आरंभल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.