नवी दिल्ली – आपल्या देशाबाबत प्रेम व अभिमान कसा असला पाहिजे हे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडून शिकले पाहिजे. माझ्यासाठी तोच आदर्श खेळाडू आहे असे वेस्ट इंडिजचा द्रुतगती गोलंदाज शेल्डॉन कॉट्रिलने म्हटले आहे.
कॉट्रिल हा वेस्ट इंडिजच्या सेनादलात आहे. विश्वचषक स्पर्धेत विकेट घेतल्यानंतर सॅल्यूट ठोकत तो आनंद व्यक्त करीत असे. त्याची ही शैली खूपच ख्यातनाम झाली होती.
धोनी याला भारताच्या प्रादेशिक सेनेमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. या सेनेतील कामाचा अनुभव घेण्यासाठी धोनीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून दोन महिने विश्रांती घेतली आहे. धोनीला 2018 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण सन्मान देण्यात आला होता. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण मी घरी अनेक वेळा पाहिले आहे असे कॉट्रिलने समाजमाध्यमावर म्हटले आहे.