Dhiraj Sahu : झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने धाड टाकली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे. साहू यांच्याशी संबंधित झारखंड, ओडिशामधील ठिकाणांवर धाडी टाकून प्राप्तीकर विभागाने ही मालमत्ता जप्त केली आहे. धीरज साहू आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपवर आयकर छाप्यात आतापर्यंत 300 कोटी रुपये वसूल करण्यात आले असून या रकमेत वाढ होत आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही ट्विटरवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “बंधू उत्तर तर द्यावेच लागेल, तुम्हाला ही (धीरज साहू) आणि तुमचे नेते राहुल गांधींनाही”, अशी पोस्ट करून हे पैसे कुणाचे? याचे उत्तर जेपी नड्डा यांनी मागितले आहे.
बंधु जवाब तो देना पड़ेगा, तुमको भी और तुम्हारे नेता राहुल गांधी को भी। ये नया भारत है, यहाँ पर राजपरिवार के नाम पर जनता का शोषण नहीं करने दिया जाएगा।भागते भागते थक जाओगे, लेकिन क़ानून पीछा नहीं छोड़ेगा।
अगर कांग्रेस भ्रष्टाचार की गारंटी है तो मोदी जी भ्रष्टाचार पर कार्यवाही की… pic.twitter.com/4WtnUoXs88
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) December 10, 2023
जेपी नड्डा यांनी आपल्या पोस्टमध्ये , “हा नवा भारत आहे. येथे राजघराण्याच्या नावावर जनतेचे शोषण करू दिले जाणार नाही. तुम्ही पळून पळून थकून जाल, पण कायदा तुमचा पिच्छा सोडणार नाही. काँग्रेस जर भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर पंतप्रधान मोदी हे ‘भ्रष्टाचारावर कारवाईची गॅरंटी’ आहेत. जनतेकडून लुटलेला पै-पै परत द्यावा लागेल.” असे म्हटले आहे.
दरम्यान काँग्रेसने खासदार धीरज साहू यांच्या कारवाईनंतर हात झटकले आहेत. काँग्रेसचे सचिव आणि खासदार जयराम रमेश यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा काहीही संबंध नाही. या संपत्तीबाबत फक्त साहूच सांगू शकतात. तसेच प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घर-कार्यालयात सापडलेल्या रोख रकमेबाबत साहू यांनीच सर्व काही स्पष्ट केलं पाहिजे.