धैर्यशील कदमांना आमदार करण्याचा निर्धार

भीमराव पाटील : कराड उत्तर मतदारसंघामधून विधानसभा निवडणूक लढवणारच

पुसेसावळी  – कराड उत्तर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय वर्धन ऍग्रो संघटनेने घेतला आहे. धैर्यशील कदम यांना कोणत्याही परिस्थितीत आमदार करायचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते भीमराव पाटील यांनी
केले. पुसेसावळी, ता. खटाव येथील दत्त मंगल कार्यालयात वर्धन ऍग्रोचे चेअरमन आणि कराड उत्तरचे युवा नेते धैर्यशील कदम यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस माजी नगराध्यक्ष संपतराव माने, हिंदुराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, नारायण काकडे, भीमराव डांगे, सुनील पाटील, पृथ्वीराज निकम, दीपक लिमकर, विकास राऊत, राजेंद्र ढाणे, विकास जाधव, नीलेश माने, शैलेश चव्हाण, अधिराज माने, सुहास पिसाळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. भीमराव पाटील म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेत्यांनी मदत केली असती तर धैर्यशील कदम नक्‍कीच आमदार झाले असते. मात्र, या नेत्यांनी साथ दिली नाही, म्हणूनच येणारी निवडणूक कार्यकर्त्यांच्या व संघटनेच्या जोरावर लढवावी लागेल. नीलेश माने म्हणाले, निवडणूक दुरंगी अथवा तिरंगी झाली तरी कार्यकर्त्यांनी आत्मविश्‍वासाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करावी.

धैर्यशील कदम म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेला फसवण्याचे काम केले आहे. हणबरवाडी-धनगरवाडी योजना आपल्या मतदारसंघात चेष्टेचा विषय झाली आहे. ही योजना पूर्ण होणे, हे स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांचे, पी.डी. पाटील यांचे स्वप्न आहे, असे सांगून प्रत्येक निवडणूक त्यांनी लढवली. मग, गेली वीस वर्षे ही योजना पूर्ण का झाली नाही? आता म्हणतात की, आमची सत्ता नाही; परंतु तुमच्या आघाडीची सत्ता असताना काय दिवे लावले?पाणी योजना पूर्ण करण्यासाठी लागणारी धमक तुमच्या अंगात नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या यांच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगितले जाते; परंतु विद्यमान आमदार विचारतात की, दीडशे कोटींचा विकास नक्‍की आहे तरी कुठे? तर त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणारे कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणतात की, आम्ही दीडशे कोटी दिले.

आता, दीडशे कोटींचा निधी आला किंवा नाही, याचे उत्तर विद्यमान आमदार व कॉंग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षांनी कराड उत्तरच्या जनतेला द्यावे. बैठकीस सुनील पाटील, दत्तात्रय साळुंके, पृथ्वीराज निकम, विकास जाधव, तात्या साबळे, दुष्यंतराजे शिंदे, अधिराज माने, उद्धव गायकवाड, राजेंद्र ढाणे, प्रमोद ढाणे, सुहास पिसाळ, उमेश मोहिते, संजय सूर्यवंशी, राहुल साळुंके,सुहास जाधव, प्रकाश पाटील, महेश चव्हाण, प्रशांत यादव, दाऊद पटेल, अमोल पाटील, भीमराव घोडके, विविध गावचे सरपंच,उपसरपंच, सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.