नवी दिल्ली – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत रोखठोक शैलीत किरीट सोमय्या यांच्यावर पत्रकार परिषद घेत घणाघात केला. राऊत यांनी नौदलाची बंद पडलेली ऐतिहासिक युद्ध नौका आयएनएस विक्रांत ही भंगारात काढण्याऐवजी ती जतन करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जनतेकडून मोठ्या प्रमाणात निधी जमवला. लोकांनीही हा भावनिक विषय असल्याने त्यांना भरभरून पैसे दिले, पण या पैशाचे नंतर काय झाले असा सवाल उपस्थित केला. त्यांचा या आरोपावर भाजप नेते आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावर आता राऊत यांनी फडणवीसांवर टीका करत प्रतिउत्तर दिले आहे.
‘आएनएस विक्रांतच्या नावाखाली जमा केलेल्या पैशांमध्ये भ्रष्टाचार करून देशभावनेशी खेळणाऱ्या किरीट सोमय्या यांची वकिली देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी सोमय्या यांच्यासारख्या देशद्रोही व्यक्तीचं समर्थन करत असताना संघाच्या दिवंगत नेत्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल?’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले,’ फडणवीस राष्ट्रभक्तीवर गाणी गातात, भाषणं देतात. दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती, हिंदुत्व शिकवतात…मात्र काल ज्या पद्धतीने राष्ट्रद्रोही, देशद्रोही व्यक्तीची फडणवीस यांनी वकिली करण्याचा प्रयत्न केला ते पाहून स्वर्गात गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, हेगडेवार तसेच आजचे मोहन भागवत यांचा जीव तीळतीळ तुटला असेल.’ असं म्हणत राऊत यांनी घणाघात केला आहे.
दरम्यान,विक्रांत फाइल्स काश्मीर फाइल्सपेक्षा गंभीर आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. राजभवनातून माहितीच्या अधिकारात आलेल्या उत्तराची प्रत आणि विक्रांतच्या नावाने जमवलेल्या पैशाचा सारा तपशील आपल्याकडे आहे, असे राऊत यांनी सांगितले. आयएनएस विक्रांत हा देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेला विषय आहे. यावरून जमवलेल्या पैशाची माहिती जनतेला मिळालीच पाहिजे, असे ते म्हणाले. या पैशाचा गैरवापर करून सोमय्या यांनी देशाशी गद्दारी केली आहे. त्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. राज्याच्या हद्दीत गुन्हा घडल्याने राज्यातील यंत्रणांनी त्याचा तपास करायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्रीय यंत्रणांनी सोमय्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. हे पैसे त्यांनी 2014 साली आपल्या लोकसभा निवडणुकीसाठी आणि आपल्या खासगी कंपनीसाठी वापरले, असा आरोपही त्यांनी केला.