मुंबई – भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज (ता. 13) मुंबईत पार पडली. त्यात ही निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत ही जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्कप्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था 1982 पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत असून ती संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकाॅनाॅमिक कौन्सिलशी संलग्न आहे.
आजच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी, राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची उपाध्यक्षपदी, भाई गिरकर यांची सचिवपदी, तर अरविंद रेगे यांची कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेद्वारे अनेकवेळा भाजप कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्गाचे आयोजनही करण्यात येत असते.