लॉकडाउन काळातील वीज बिल माफीसाठी 19 मार्च रोजी राज्यभर रास्ता रोको करणार- राजू शेट्टी

कोल्हापूर – लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले तातडीने माफ करावीत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 19 मार्च रोजी राज्यभर रास्ता रोको करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. तसेच उद्या दि. 14 पासून सरकारच्या निर्णयाच्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री यांचे पुतळे जाळा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. लाखो लोकांचा रोजगार बुडाला. हजारो कामगारांच्या नोकर्‍या गेल्या. तीन महिन्याच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी आम्ही गेल्या जून महिन्यासून  रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहोत. सरकार वेळोवेळी सांगत  आहे की, आम्ही जनतेला दिलासा देणार आहोत.

जनतेला गोड बातमी देणार आहोत. विधानसभेमध्ये विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पुढील निर्णय होईपर्यंत कुणाची वीज कनेक्शन कट केले जाणार नाही.  अधिवेशन संपले तरीही कोणताही निर्णय झालेला नाही. अधिवेशन संपताच वीज कनेक्शन कापण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

एमएसईबीच्या कर्मचार्‍यांना देखील वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच काय गावची थकबाकी असेल तर संपूर्ण गावाचीच वीज कापण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री सांगतात, आम्ही वीज बिल वसुलीची सक्ती करणार नाही. तर अर्थमंत्री म्हणतात, सरकारकडे पैसाच नाही. मग हे काय दोन पक्षामधील भांडण आहे काय? अर्थमंत्री सक्तीच्या वसुलीला स्टे देतात.

अधिवेशन संपल्यावर ऊर्जामंत्री स्टे उठवतात. दोघांमधील भांडणामुळे जनतेला वेठीस का धरत आहात. अगोदरच मार्च एण्डिंगमुळे लोकांच्याकडे पैसा नाही. एवढा पैसा आणायचा कोठून? किमान त्याला काही तरी मुदत देणे आवश्यक होते. मात्र ती मुदत न देता सरकार सर्वसामान्य माणसाच्या जिवाशी खेळ करत आहे. म्हणून येत्या 19 मार्च रोजी संपूर्ण राज्यभर रास्ता रोको करून आम्ही सरकारच्या या धोरणाविरोधात संघर्ष करणार आहोत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.