कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जाणीवपूर्वक अवमूल्यन केले आहे. या प्रकाराबद्दल फडणवीस यांनी माफी मागण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.
या पत्रकात म्हटले आहे, बुधवार, दि. 6 मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे. त्याअनुषंगाने अभिवादन करण्यासाठी फडणवीस यांनी टाकलेल्या फेसबुकच्या पोस्टमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख थोर सामाजिक “कार्यकर्ते” असा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना खऱ्याअर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कळले नाहीत, अशी टीकाही या पत्रकात केली आहे.
खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे पुरोगामी चळवळीचे अध्वर्यू होते. त्यामुळे प्रतिगामी शक्ती नेहमीच त्यांचा द्वेष करीतच आल्या आहेत. फडणवीसांकडून झालेला हा एकेरी उल्लेख सुद्धा त्याचेच द्योतक आहे. म्हणजेच फडणवीस यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जाणीवपूर्वक अवमूल्यन केले आहे.
वास्तविक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टीचे, समतेचे आणि लोक कल्याणकारी असे महान ऋषितुल्य राजे असताना त्यांचा उल्लेख “कार्यकर्ते” असा एकेरी होणे हा आम्हा जनतेचा अवमान आहे. हा अपमान आम्ही शाहूप्रेमी जनता कदापिही सहन करणार नाही. याबाबत फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.