वॉशिंग्टन: अमेरिकेला चीनकडूनच सर्वाधिक धोका आहे, असा इशारा अमेरिकेचे नियोजित गुप्तचर विभाग प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांनी दिला आहे. आपल्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांची जी नॅशनल इंटेलिजन्स विभागाच्या समोर सुनावणी झाली त्यात बोलताना त्यांनी हा इशारा दिला. आपली जर या विभागाच्या प्रमुख पदी निवड झाली तर या विभागाची सर्व ताकद आपण बीजिंगची वाढती शक्ती आणि त्याचा अमेरिकेला असलेला धोका याला निरस्त करण्यासाठीच खर्च करू असे त्यांनी म्हटले आहे. जर त्यांच्या या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले तर अमेरिकेतील 17 प्रमुख गुप्तचर यंत्रणांचे नेतृत्व त्यांच्याकडे जाणार आहे.
ते म्हणाले की, करोनाचे संकट आणि त्यात चीनने निभावलेली भूमिका, 5 जी स्पेक्ट्रमसाठी निर्माण झालेली स्पर्धा, सायबर सिक्युरिटीला निर्माण झालेला धोका, ही सारी प्रकरणे चीनकडेच बोट दाखवतात असे त्यांनी या सुनावणीत नमूद केले. संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनने विविध प्रकल्पांद्वारे जी पद्धतशीर व्युहरचना केली आहे त्याचाहीं तपशील त्यांनी यावेळी सादर केला. चीनला जागतिक व्यापार, व्यापार मार्ग आणि टेलिकम्युनिकेशन या साऱ्यांवर नियंत्रण करायचे आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. क्वांटम कम्पाऊंडिंग या विज्ञान विषयात चीनने जी गुंतवणूक केली आहे तीही अधिक चिंताजनक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.