पिंपरी – वडील टेम्पोचालक. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. एका खोलीत ती वडिलांसह राहते. गेल्या वर्षी आईचे निधन झाले. मात्र, अशा परिस्थितीतही तिने जिद्द सोडली नाही. आजीकडे राहून आणि दररोज 7 तास अभ्यास करून तिने उत्तुंग यश खेचून आणले.
चिखलीतील दीक्षा संजय आनंदपुरे हिच्या यशाची ही कहाणी. कठीण काळातही दीक्षा हिने कच न खाता दहावीच्या परीक्षेत 92.80 टक्के इतके गुण मिळविले आहेत. महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपये बक्षीस दिले जाते.
महापालिका शाळांतील 5 विद्यार्थी यंदा त्याचे मानकरी ठरले आहेत. दीक्षाचे वडील टेम्पोचालक आहेत. ते दरमहा 12 ते 15 हजार रुपये कमावतात. त्यामुळे तिचे हे यश “लाख’मोलाचे ठरले आहे.
मला लाल दिव्याच्या गाडीत फिरायचंय…
दैनिक “प्रभात’शी बोलताना दीक्षा म्हणाली, आयएएस ऑफिसर होण्याचे माझे स्वप्न आहे. मला लाल दिव्याच्या गाडीत फिरायचे आहे. पहिलीपासून दहावीपर्यंत शाळेत प्रथम क्रमांकच मिळविला आहे. महापालिकेचे 1 लाख रुपयांचे बक्षीस मिळविण्याचे उद्दिष्ट मी डोळ्यांसमोर ठेवले होते. ते उद्दिष्ट मी गाठू शकले.