“देशातील सात मोठ्या क्षेत्रांमध्ये साडेतीन कोटी लोक बेरोजगार”

वाढत्या बेरोजगारीवरून प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील सरकारला धारेवर धरले आहे. या संदर्भात आपल्या ट्विटर हॅंडलवर केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी देशातील बेरोजगारीवरून सरकारवर टीका केली आहे. नोकऱ्या देण्याच्या सर्व आश्वासनांची वस्तुस्थिती अशी आहे की, देशातील सात मोठ्या क्षेत्रांमध्ये सुमारे साडेतीन कोटी लोक बेरोजगार झाले आहेत असे म्हणत प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.


देशातील वाढत जाणाऱ्या बेरोजगारीवर बोलताना प्रियंका गांधी यांनी, मोठ-मोठी नावे आणि जाहिरातींचा परिणाम असा आहे की तीन कोटी 64 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. त्यामुळेच सरकार नोकऱ्यांबद्दल बोलायला कचरत आहे, असा आरोप त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही साडेतीन कोटी लोक बेरोजगार झाल्याचा मुद्दा रविवारी मांडला होता. जर देशातील तरुणांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही तर मग गणतंत्र कसे काय मजबूत होईल, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या माध्यमातील एका बातमीचा उल्लेख करून त्यांनी हे ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या कोट्यवधी शिक्षित युवकांचा विचार करूया. जे रोजगार मिळवण्यासाठी रोज संघर्ष करताहेत. रोजगार मिळाल्यावरच ते प्रतिष्ठेने जीवन जगू शकतील, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, रायबरेलीमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात बोलताना प्रियांका गांधी यांनी म्हटले होते की, भाजप सर्व मुद्द्यांवर खोटे बोलत आहे. त्यांच्या खोटेपणाचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्वांना सज्ज राहिले पाहिजे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here