नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी प्रथमच ड्रोन रोधक शस्त्रे वापरण्यात आली. या उपकरणात डिआरडीओने स्वतंत्रपणे विकसीत केलेल्या उपकरणांचा समावेश होता.
गुप्तचर खात्याने दिलेल्या अहवालानंतर ही उपकरणे वापरण्याचे आदेश देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. पाकिस्तानातील काही दहशतवादी गटांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडवर ड्रोनने हल्ला करण्याचा कट रचला असल्याचा अहवाल गुप्तचर खात्याने दिला होता.
हा हल्ला हाणून पाडण्यासाठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, असे गुप्तचर खात्याने सुचवले होते. यानंतर या संदर्भातील माहिती संकलीत करण्यात आली. त्यात विविध आकाराचे सहा लाख ड्रोन असल्याची बाब ठळकपणे प्रकाश झोतात आली.
या ड्रोनगनमध्ये रेडीओ लहरी, जीपीएस सिस्टिम आणि मोबाईल सिग्नल रोखण्याची क्षमताआहे. ऑस्ट्रेलियात बनवलेल्या उपकरणाची रेंज दोन किमीची आहे.