मुंबई : राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समुहसंसर्गाची लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’ संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी राज्यातील जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
राज्यात आज सात नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १९३ झाली आहे. जनतेने घरातच थांबून योग्य काळजी घेतल्यास, खरेदीची गर्दी टाळल्यास, विलगीकरण केलेल्या संशयित रुग्णांनी सूचनांचे पालन केल्यास आपण निश्चितपणे ‘कोरोना’ला रोखू शकतो. त्यासाठी राज्यातल्या प्रत्येकानं यापुढचे किमान दोन आठवडे घराबाहेर न पडण्याचा संकल्प करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात काम करत असलेले डॉक्टर, आरोग्य, पोलीस, महसूल, बँक कर्मचारी तसेच शासनाच्या विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले असून शासकीय यंत्रणा ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी तयार असल्याचा विश्वास राज्यातील जनतेला दिला आहे. ‘कोरोना’ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हजार शासकीय व खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हे उपचार केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलेल्या आवाहनाचं जनतेने पालन करावं. राज्य सरकार, केंद्र सरकार व देशातील जनता सर्व मिळून ‘कोरोना’च्या विरुद्धचा लढा आपण जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे