लखनौ – ‘कोरोना’ नुसतं नाव ऐकलं तरी धडकी भरते ना? गतवर्षी सर्वप्रथम चीनमध्ये सापडलेल्या या विषाणूने आज जगभरामध्ये थैमान घातलं आहे. अमेरिका, इटली, ब्रिटन अशा विकसित देशांतील आरोग्य व्यवस्थेला मेटाकुटीला आणणारा हा संसर्जन्य विषाणू आता भारतात देखील आपली दहशत कायम करू पाहतोय. मात्र जगभरामध्ये हजारो लोकांचे प्राण घेणारा हा ‘कोरोना’ उत्तर प्रदेशातील एका गावासाठी एक वेगळीच डोकेदुखी घेऊन आलाय. कोरोना या नावामुळे येथील गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कोरोना या रोगाशी काडीमात्र संबंध नसताना देखील केवळ नावामुळे लोक या गावातील नागरिकांकडे संशयाच्या नजरेने पाहायला लागलेत.
ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील सितारपूर जिल्ह्यामध्ये वसलेल्या ‘कोरोना’ या गावाची. होय, तुम्ही बरोबर वाचलंय या गावाचं नाव कोरोना असून त्याचा कोरोना रोगाशी काडीमात्र संबंध नाहीये. मात्र कोरोना रोगाने निर्माण केलेल्या दहशतीमुळे येथील गावकऱ्यांना आसपासच्या गावांकडून तुच्छतेची वागणूक मिळतिये.
एरवी ‘नावात काय असतंय?’ असं म्हंटलं जातं मात्र ‘नावात खूप काही असतंय’ याचाच प्रत्यय ‘कोरोना’वासीय सध्या घेताना दिसतायेत. याबाबत एका नामांकित वृत्तसंस्थेने माहिती दिली असून येथील नागरिक सध्या ‘कोरोना’ नावामुळे अक्षरशः हैराण झाले आहेत. गावातील एका महिलेने नावावरून उडालेल्या गोंधळाबाबत माहिती देताना, “जेव्हा आम्ही इतरांना सांगतो की आम्ही कोरोना गावचे आहोत तेव्हा ते आमच्यापासून दूर पळतात. कोरोना हे आमच्या गावाचं नाव असून आमचा कोरोना रोगाशी कसलाच संबंध नाही. कोरोना हे आमच्या गावाचं नाव आहे ही इतकी साधी गोष्ट इतरांच्या लक्षात येत नाही.” अशी व्यथा मांडली आहे.
कोरोना हा आजार निश्चितच प्राणघातक असून त्याची लागण होऊ नये यासाठी योग्य ती खबदारी घेणे देखील योग्यचं. मात्र या रोगाशी काडीमात्र संबंध नसलेल्या कोरोना गावच्या नागरिकांना अशी हिणकस वागणूक देणे म्हणजे बुद्धीचा अभावच म्हणावा लागेल. नाही का?
Residents of Corona, a village in Sitapur say they have been facing discrimination, ever since the outbreak of #coronavirus. Rajan, a villager says, “When we tell people we are from Corona, they avoid us. They don’t understand that it’s a village, not someone infected with virus” pic.twitter.com/gxz6oIx8UP
— ANI UP (@ANINewsUP) March 29, 2020