100 रुग्ण आढळले : ग्रामपंचायत, आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू
भवानीनगर – काटेवाडी (ता. बारामती) येथे आतापर्यंत डेंग्यू सदृश्य 100 रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वैद्यकिय सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
ताप येणे, डोकेदुखी, स्नायू व सांधे दुखी, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे, खोकला येणे, श्वसनाचा त्रास होणे, अंग दुखणे अशा प्रकारचे लक्षणे आढळल्यास रक्ताची तपासणी त्वरित करून घेणे महत्त्वाचे आहे. वरील सर्व लक्षणे डेंग्यू व चिकुनगुनिया सदृश्य आजाराची आहेत, असे आरोग्य केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायत काटेवाडीच्या वतीने गावामध्ये धूरफरवारणी करण्यात आली असून आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, डासांपासून संरक्षणासाठी खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, असे आवाहन ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
डेंग्यू व चिकनगुनिया आजाराला न घाबरता ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र जे काही उपाय योजना सांगेल त्याप्रमाणे कार्यवाही करावी. ग्रामपंचायतीच्या वतीने ज्या-ज्या उपाययोजना करता येतील त्या सुरू केल्या आहेत.
– विद्याधर काटे, सरपंच, काटेवाडी
काटेवाडी परिसरामध्ये डेंग्यू सदृश्य 50 ते 55 रूग्ण आढळून आले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला पाहिजे. घरातील पाणीसाठा हा कमी केला पाहिजे. स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, त्यासाठी घराच्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, तरच डेंग्यूच सदृश्य रोगापासून नियंत्रण मिळू शकेल.
– डॉ. मार्तंड जोरी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काटेवाडी