पिंपरी – पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो स्थलांतरित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पुनावळेतील नागरिकांना दिले. कचरा डेपोविरोधात पुनावळे, मारुंजी, जांभे, नेरे, विनोदेवस्ती परिसरातील सोसायटीधारकांनी रस्त्यावर उतरून बाईक रॅली आयोजित केली होती. त्यानंतर नागरिकांनी काटे यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. या वेळी काटे यांनी हे आश्वासन दिले.
महापालिकेने 2008 मध्ये पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केला आहे. त्या वेळी परिसराचे नागरीकरण झालेले नव्हते. कालांतराने 15 वर्षांत या परिसरातील लोकसंख्या एक लाख पेक्षा अधिक झाली आहे. नैसर्गिक वातावरण, बाजूला असलेले आयटी पार्क आणि पुनावळे येथे आरोग्य, शिक्षण, गृह प्रकल्प या सुविधांमुळे नागरिक येथे राहण्याला पसंती देत आहेत. प्रस्तावित कचरा डेपोला नागरिक विरोध करत आहेत. मात्र, तरीही महापालिका प्रशासनाने जागा ताब्यात घेण्यासाठी वन विभागाला चंद्रपूर येथे जमीन विकत घेऊन देण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.
पुनावळे येथे लवकर कचरा डेपो उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कचरा डेपो स्थलांतरित करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे काटे म्हणाले.
पुनावळे नियोजित कचरा डेपोच्या सभोवताली अनेक उच्चभ्रू सोसायटी आहेत. या डेपोचा त्रास येथील नागरिकांना होणार आहे. या भागात अनेक आयटी कर्मचारी वास्तव्यास आले आहेत. या कचरा डेपोच्या सभोवताली टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. मध्यभागी होणारा पुनावळे कचरा डेपो मानवी जीवनाचा विचार करता शहराच्या अन्य भागात स्थलांतरित करावा, अशी मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे.
– नाना काटे, माजी विरोधी पक्षनेता, पिंपरी-चिंचवड महापालिका.