पिंपरी – एकीकडे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सात महिन्यांमध्ये केवळ एकच डेंग्यूचा रुग्ण आढळल्याचे सांगितले जात आहे तर दुसरीकडे कामगारांसाठी कार्यरत असलेल्या रुग्णालयामध्ये मात्र 49 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसत आहे. औद्योगिक परिसरात डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या वर्षी चिंचवड येथील ईएसआय रुग्णालयात डेग्यूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहेत. सात महिन्यांत 49 रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात योग्य उपचार केले जात आहेत. मात्र गरज वाटल्यास पुढील उपचारासाठी इतर संलग्नित रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जात आहे. ईएसआय रुग्णालयात एवढी मोठी संख्या आढळली असून पिंपरी-चिंचवड महापालिका केवळ एकच रुग्ण आढळल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या दोन्ही आकड्यांमध्ये मोठी तफावत आढळल असल्याचे स्पष्ट होत आहे.
वातावरणातील बदलामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक परिसरातील कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या रुग्णालयात सर्दी, तापाने त्रस्त असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सध्या 40 जणांची ओपीडीमध्ये नोंद होत आहे. या पैकी 50 टक्केपेक्षा अधिक रुग्ण सर्दी, तापाचे आढळत आहेत. या मध्ये डेग्यूंचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. गेल्या सात महिन्यांत जानेवारी ते जुलैमध्ये एकूण 49 डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले आहेत. तसेच ज्यांना अधिकचा त्रास होत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी संलग्नित रुग्णालयात पाठविले जात आहे. गेल्या आठवड्यात एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देखील या रुग्णांचा अहवाल घेतला जातो. मात्र त्यांच्याकडे केवळ एकच रुग्ण आढळला असल्याची नोंद आहे. केवळ संशयित रुग्ण असल्याने त्याला डेंग्यूचा रुग्ण म्हणून धरला जात नसल्याचे अजब उत्तर महापालिका देत आहे. या दोन्ही रुग्णालयातील आकडेवारी पाहता प्रशासनाने योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे.
प्लेटलेट्सची वेळेत तपासणी करा
डेंग्यूच्या आजारामध्ये येणाऱ्या तापामुळे शरिरातील प्लेटलेट्सचे प्रमाण हे कमी होत असते. मात्र हे प्रमाण फार कमी होऊ नये यासाठी यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. डेंग्यूमध्ये हे प्रमाण कमी होत असते. प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात आहे किंवा नाही, याची काळजी घेण्यासाठी वारंवार तपासणी करून खात्री करून घेणे गरजेचे आहे. रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण 10 हजारांच्या खाली आल्यास, रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स देण्याची वेळ येते. त्यामुळे प्लेटलेट्सची वेळेत तपासणी करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
कंपन्यांनी खबरदारी घ्यावी
पिंपरी-चिंचवडसह, तळवडे, चाकण आदी भागात असणाऱ्या कंपन्यांमध्ये तसेच परिसरात पावसाचे पाणी साचत आहे. गंजलेले लोखंड अथवा इतर वस्तूंजवळ पाणी साचल्याने डासोत्पत्तीला कारण ठरत आहे. त्याचा त्रास कामगारांना होऊन डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पाणी साचू देऊ नये, यासाठी कंपन्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका आरोग्य विभाग देखील करत आहे. तसेच कंपन्यांच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.