शाळांचे लेखापरीक्षण पुढे ढकलण्याची मागणी

सातारा – समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे लेखापरीक्षण दरवर्षी होत असते. यावर्षी करोनाचे संकट वाढत असून अनेक अधिकारी, कर्मचारी करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय अनेक बॅंकांमधून शाळांची पासबुके भरुन मिळत नसल्याने गुरुवारपासून (दि. 17) होणारे शाळांचे लेखापरीक्षण पुढे ढकलावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना इ- मेलद्वारे याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी कोविड-19 मुळे सध्या शाळा सुरु नाहीत. शिक्षक ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देत आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. प्रत्येक तालुक्‍यात बाधितांची संख्या वाढत आहे.

अशा गंभीर परिस्थितीमध्ये लेखापरीक्षण घेत असताना प्रत्येक केंद्रातील चार शाळा धरल्या तरी शिक्षकांची खूप गर्दी होणार आहे. यादरम्यान एखाद्याला करोनाची लागण झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न देवरे यांनी केला आहे. सध्या प्रवासाची साधने जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्याने तालुक्‍याच्या ठिकाणी पोहचणे अवघड आहे. त्यामुळे करोनाची परिस्थिती स्थिर झाल्यानंतर लेखापरीक्षण घेण्यात यावे, अशी मागणी समितीच्यावतीने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.