करोनाच्या संकटात प्राथमिक शिक्षकांनी जागवल्या संवेदना

सातारा -करोनाचा कहर वाढत असताना बेड, ऑक्‍सिजन, रुग्णवाहिका मिळण्यातही अडचणी येत आहेत. एका प्राथमिक शिक्षकाचा ऑक्‍सिजनअभावी दुर्देवी अंत झाला. या संकटात प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूने प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन अन्य कोणावर अशी बिकट वेळ येऊ नये यासाठी निधी संकलन करुन सहा ऑक्‍सिजन मशीन्स, 13 टेम्प्रेचर गन, ऑक्‍सीमीटर घेऊन संवेदना जागवल्या. संघटनात्मक वादविवाद विसरुन शिक्षकांनी एकत्र येवून जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी सध्याच्या संकटात ऑक्‍सिजन बेड उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत आहे. प्राथमिक शिक्षक करोना संकटात विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असल्याने त्यांना या परिस्थितीची पूर्णत: जाण आहे. काही दिवसांपूर्वी सातारा तालुक्‍यातील एका प्राथमिक शिक्षकाचा ऑक्‍सिजनअभावी मृत्यू झाला.

आपल्या सहकाऱ्यावर जी वेळ आली ती अन्य कोणावरही येऊ नये यासाठी गणेश दुबळे, दीपक भुजबळ, रमेश लोटेकर, शिवाजी भोसले, शशिकांत घाडगे, प्रकाश बडदरे, संतोष चव्हाण, चेतन तोडकर, संदेश जंगम, रणजित गुरव, महावीर तुपसमिनदर, कचरनाथ शिंदे, संतोष लोहार, सुशांत मोतलिंग, उद्धव पवार, शहनाज तडसरकर, माहेश्‍वरी कोळेकर, रवींद्र कुंभार, विशाल जमदाडे, राहुल घाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत धाडसी निर्णय घेत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना कोविड निधीबाबत आवाहन केले.

आवाहनाला विविध शिक्षक संघटनांच्या सदस्यांनी प्रतिसाद दिल्याने दोन दिवसांतच सहा ऑक्‍सिजन मशीन्स, 13 टेम्प्रेचर गन, ऑक्‍सीमीटर खरेदी करण्यात आले. 11 पंचायत समित्यांमध्ये 11, जिल्हा परिषद शिक्षण विभागात एक, प्राथमिक शिक्षक बॅंकेत एक अशा 13 टेम्प्रेचर गनचे वितरण करण्यात आले. सहा ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर मशिनची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली.

प्राथमिक शिक्षकांच्या कुटुंबातील करोनाबाधित रुग्णाला ऑक्‍सिजनची गरज असेल तसेच ऑक्‍सिजन बेड मिळत नसेल तर लगेच ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर मशिन्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी शिक्षकांचे कौतुक केले. मशिन सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत पोवई नाक्‍यावरील शिक्षक भवनात उपलब्ध होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.