येरळवाडी तलाव ओव्हरफ्लो…!

नितीन राऊत
वडूज -खटाव तालुक्‍याला वरदान ठरणारा येरळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून वाढत्या पाणीपातळीमुळे सांडव्याच्या पूर्व भागातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या विसर्गामुळे बनपुरी गावापासून येरळेचे नदीपात्र लवकरच प्रवाहित होणार असल्याने नदी तीरावरच्या गावांतील भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. सलग तीन वर्ष हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत असून, दुष्काळी जनतेला मोठा आधार मिळत आहे. सुमारे सव्वा टीएमसी क्षमता असलेल्या तलाव्याचे पाणी सांडव्यावरून वाहत असल्याने परिसरात मच्छिमारीला उधाण आले आहे.

खटाव तालुक्‍यातील सुमारे सत्तर गावांमधील जनतेला पाणीपुरवठा करणारा प्रमुख स्रोत येरळवाडी तलाव आहे. याच तलावावर मायणी, वडूज, खातवळ, गुरसाळे, नढवळ, येरळवाडी, अंबवडे आदी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तर तलावाशेजारील शेती व बनपुरी टॅफर फिडिंग पॉइंटलाही येरळवाडीतून पाणीपुरवठा होतो. खटाव तालुक्‍यातील जनतेला होणारा पाणीपुरवठा कमी झाल्यास या तलावात उरमोडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो.

यावर्षी ही नेहमीपेक्षा जादा अवर्तने सोडून दुष्काळी जनतेची तहान भागविण्यात आली. हा तलाव भरण्यासाठी नुकतेच उरमोडीचे अवर्तन तलावात सोडण्यात आले होते. मात्र, तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याअगोदर ते पुढे माण तालुक्‍यात नेण्यात आले.

मात्र, वरूणराजाने तालुक्‍याच्या पश्‍चिम भागासह तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गत आठवड्यात चांगली हजेरी लावल्याने तलावात पाणीसाठ्यात वाढ होऊन हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे सांडव्याच्या पूर्व भागातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्यास मदत झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.