नवी दिल्ली – इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील स्टार लिंक कंपनी भारतामध्ये इंटरनेट सेवा देण्याचा परवाना नसतानाही ग्राहकांकडून पैसे जमा करीत असल्याचा आरोप टेलिकॉम वॉचडॉग या बिगर सरकारी संस्थेने केला आहे. या कंपनीविरोधात फौजदारी कारवाई होण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
या विषयावर दूरसंचार विभागातील कर्मचारी योग्य वेळी आवश्यक ती कारवाई करत नाहीत. या अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करावी असे पत्र या संस्थेने दूरसंचार सचिवना पाठविले आहे. यासंदर्भात दूरसंचार विभाग व स्टारलिंकने वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली नाही. टेलिकॉम वॉचडॉगने दूरसंचार विभागाकडे स्टार लिंक विरोधात 29 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे.
स्टार लिंक कंपनी परवाना नसतानाही भारतीय ग्राहकांना ब्रॉडबॅंड सेवा देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे जमा करीत आहे. दूरसंचार विभागाने गेल्या आठवड्यात स्पष्ट केले आहे की, स्टार लिंकला भारतात सॅटेलाइट आधारित इंटरनेट सेवा देण्याचा परवाना देण्यात आलेला नाही. ही कंपनी या संदर्भात जाहिरात करीत असून जनतेने या कंपनीकडून सेवा घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्टार लिंक कंपनीने परवाना नसताना अशा प्रकारच्या सेवा देण्याची जाहिरात करू नये आणि भारतातील नियमांचे पालन करावे असे दूरसंचार विभागाने या कंपनीला कळविले आहे.
टेलिकॉम वॉचडॉगने म्हटले आहे की, ही कंपनी बेकायदेशीर काम करीत असताना दूरसंचार विभागाचे अधिकारी काहीच करीत नसल्याबद्दल चौकशी होण्याची गरज आहे. स्टार लिंकने 11 हजार लोकांकडून 99 डॉलर घेतले आहेत. ही रक्कम मोठी असून परकीय चलनातील आहे. याचे उत्तरदायित्व निश्चित होण्याची गरज आहे.
ग्राहकांकडून कडून जमा केलेले पैसे ताबडतोब परत करावेत असा आदेश दूरसंचार विभागाने देण्याची गरज असल्याचे या बिगर सरकारी संस्थेने म्हटले आहे.