मुंबई – सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 72 डॉलरपर्यंत कमी झाले आहेत. मात्र भारतातील तेल कंपन्या जागतिक बाजारातील 15 दिवसाच्या दराचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवितात. त्यामुळे पुढील 15 दिवस जर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी पातळीवर राहिले तरच भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
25 नोव्हेंबर पर्यंत कच्च्या तेलाचे दर 82 डॉलर प्रति पिंप या पातळीवर होते. नवीन करोना आल्यानंतर जागतिक बाजारात संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या क्रुडचा दर 72 डॉलरपर्यंत खाली आला आहे. भारतातील तेल कंपन्या दैनंदिन पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करीत असल्या तरी त्या जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दराचा 15 दिवसाचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करीत असतात.
त्यामुळे पुढील 15 दिवस कच्च्या तेलाचे दर सध्याच्या पातळीवर राहिले तरच तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करू शकतील. भारत, अमेरिका आणि इतर काही देशांनी गेल्या पंधरवाड्यात राखीव साठा कमी करून तेलाचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला फारसे यश आले नाही. मात्र करोनाच्या नव्या प्रकारामुळे क्रुडचे दर सध्या कमी झाले आहेत.