ओगलेवाडी – वनवासमाची, सदाशिवगड (ता. कराड) येथे कराड-विटा रस्त्यावरून खडी, मुरूम व डबरची वहातूक करणारे डंपरचालक मद्यप्राशन करून बेफाम वेगाने डंपर चालवत असल्याने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे महसूल व परिवहन विभागाने अशा डंपरविरोधात कारवाई करण्याची मागणी वनवासमाची ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर सरपंच महिपती माने, उपसरपंच सुभाष खोचरे, सदस्या चतुरा पाटील, छाया माने, संगिता जाधव, मोहन माने, हणमंत साळुंखे आदींच्या सह्या आहेत. वनवासमाची हे गाव कराड-विटा रस्त्याच्या कडेला वसले आहे. रस्त्याला लागूनच दोन्ही बाजूला लोकवस्ती आहे. त्यामुळे दिवसभर लहान मुले महिला, ग्रामस्थ व शेतकऱ्यांची रस्त्यावरून वर्दळ सुरू असते. गावच्या दोन्ही बाजूला धोकादायक वळणे आहेत. वारंवार या वळणार अपघात होत असतात.
वनवासमाचीपासून जवळच असलेल्या सुर्ली घाटाच्या माथ्यावर अनेक क्रशर व अन्य प्लॅंट आहेत. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावरून खडी, मुरूम व डबरची वहातूक करणाऱ्या डंपरची वर्दळ सुरू असते. मात्र बहुतांश डंबरचालक हे मद्यपान करून डंपर चालवत असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. मद्यप्राशन केलेल्या डंपरचालकांकडून बेफामपणे डंपर चालवले जात असल्याने येथील ग्रामस्थांत भितीचे वातावरण पसरले आहे. तरी अशा दारु पिवून डंपर चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, असेही नमूद केले आहे.