मनपात महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या पाट्या झाकल्या
अजूनही पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या उघड्या
नगर – निवडणूक आचारसंहिता लागू होताच राजकीय पक्ष व शासकीय योजनांशी संबंधित बॅनर, पोस्टर व होर्डिंग हटविण्यात आले आहेत. विकास कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या नावाच्या कोनशिला, फलक झाकल्या आहेत. शासकीय कार्यालयातही नावाच्या पाट्या असल्यास त्या काढण्यात येतात किंवा त्या झाकण्यात आल्या आहेत. परंतु जिल्हा परिषदेत अजूनही विविध पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या उघड्या असल्याचे आढळून आले आहे. त्या अद्यापही झाकल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 10 मार्चपासून लागू झाली असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यानुसार राजकीय पक्ष व शासकीय योजनांशी संबंधित बॅनर, पोस्टर व होर्डिंग हटविण्यात आले. विकास कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या नावाच्या कोनशिला, फलक झाकले. शासकीय कार्यालयातही नावाच्या पाट्या झाकण्यात आल्या आहेत.
महापालिकेत महापौरसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या पेपर लावून झाकण्यात आल्या आहेत. परंतू जिल्हा परिषदेला वेगळाच न्याय लावला असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतांना व आचारसंहिता लागे होवून आज 20 दिवस लोटले असतांनाही जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या उघड्याच आहेत. जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, अर्थ व बांधकाम समिती सभापती, समाजकल्याण सभापती, कृषी व पशुसंर्वधन सभापती व महिला व बालकल्याण सभापतींच्या पाट्या आजही उघड्याच आहेत. त्या अद्यापही झाकल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे सर्रास आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या पाट्या झाकण्याबाबत कोणतेही आदेश आलेले नाही. हे पदाधिकारी असून ते आपले नियमित कामकाज करीत असल्याने त्यांच्या नावाच्या पाट्या झाकल्या नाहीत.
विश्वजीत माने,मुख्य कार्यकारी अधिकारी