देहू – तीर्थक्षेत्र देहू परिसरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचल्याने परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. यामुळे, नागरिकांचे आरोग्यास धोका निर्माण होत असून रोगराई पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर ग्रामपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तीर्थक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक येतात. शासनाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिराच्या परिसरामध्ये असणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पुलालगत दोन्ही दर्शनी भागात कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत. देहू आळंदी रस्त्यावर आणि मुख्य प्रवेशद्वार समोरील भागात नागरिक, ग्रामस्थ व व्यापारी कचरा टाकत आहे. परंतु, कचरा उचलला जात नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याबाबत ग्रामसेवक अर्जुन गुडसूरकर म्हणाले, या परिसरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येते. यावेळी, स्पीकरद्वारे जनजागृती केली जाते. मात्र वेळेत जाणाऱ्या घंटागाड्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकला पाहिजे. परिसरातील रस्त्यांवर कचरा फेकणारा हा सुक्षिशित वर्ग आहे. ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो त्याच पध्दतीने परिसर व गाव स्वच्छ ठेवण्यास नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे.