शेवटच्या दिवशी उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी गर्दी
पुणे – पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी तब्बल 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत दि. 8 एप्रिल असून त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात दोन टप्प्यांत निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यात पुणे आणि बारामती लोकसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी दि. 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी गुरुवारी शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी दोन्ही मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. पुणे मतदारसंघात शेवटच्या दिवशी 36 उमेदवारांनी अर्ज तर बारामती मतदारसंघात शेवटच्या दिवशी 24 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
प्रमुख पक्षांचे उमेदवार
पुणे लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीकडून गिरीश बापट तर कॉंग्रेसकडून मोहन जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीकडून अनिल जाधव तर बहुजन समाज पार्टीकडून उत्तम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुप्रिया सुळे यांनी तर भाजपकडून कांचन कुल यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून नवनाथ पडळकर यांनी तर बहुजन समाज पार्टीकडून मंगेश वनशिव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आज अर्जांची छाननी
पुणे व बारामती मतदारसंघात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवारी (दि.5) होणार आहे. पुणे मतदारसंघातील उमेदवार अर्जांची छाननी जिल्हाधिकारी कार्यालयात तर बारामती मतदारसंघातील अर्जांची छाननी विधानभवन येथे होणार आहे.