मालखेड फाट्यावरील चेकपोस्टवर कारवाई
कराड – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मालखेड फाटा (ता. कराड) येथील चेकपोस्टवर गुरूवारी सकाळी स्कोडा कारमध्ये दीड लाखाची रोकड सापडली. ती रक्कम चेकपोस्टवरील स्थिर पथकाने ताब्यात घेतली आहे. गुरूवारी मालखेड फाटा येथे वाहनांची तपासणी सुरू असताना स्कोडा कारमध्ये (क्र. एम. एच. 09 डी. एक्स. 8101) दीड लाखाची रोकड सापडली.
कार चालक जयजीत जयकुमार परितकर (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) याच्याकडे पैशाबाबत विचारणा केली असता त्यांना त्याबाबत समाधानकारक खुलासा करता आला नाही. त्यामुळे स्थिर पथकाचे प्रमुख विशाल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष जगदाळे, आर. एच. महाडिक, ए. एस. आगे व महिला पोलीस एस. एन. कांबळे यांच्या पथकाने ती रक्कम पंचनामा करून पंचांसमक्ष ताब्यात घेतली.
लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गांवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून त्याठिकाणी स्थिर पथकाद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. कराड तालुक्यात सहा ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर गेल्या चार-पाच दिवसांत रोज रोकड सापडण्याच्या घटना घडत आहेत. आचारसंहिता काळात 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगता येत नाही. त्यापेक्षा अधिक रक्कम आढळल्यास ती ताब्यात घेण्यात येत आहे.