पुन्हा पाच साल केजरीवाल?
नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार दिल्लीत पुन्हा पाच साल केजरीवाल असे चित्र निकालातून पुढे येणार का, याविषयी मोठी उत्सुकता आहे.
राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी दिल्ली सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (आप) सत्ता राखणार असल्याचे चित्र प्रारंभीपासूनच राहिले.
अर्थात, भाजपने पूर्ण ताकद लावून अतिशय आक्रमक प्रचार मोहीम राबवल्याने निवडणुकीतील रंगत वाढली. तसे असले तरी सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनी आपची सरशी निश्चित असल्याचे भाकीत केले आहे. ते खरे ठरणार का, भाजप तगडी लढत देणार का आणि कॉंग्रेसची कामगिरी कशी असणार या प्रश्नांची उत्तरे निकालातून मिळतील.
तत्पूर्वी, दिल्लीत 62.59 टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. मागील वेळेपेक्षा यावेळी 5 टक्के कमी मतदानाची नोंद झाली. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. आमदार बनण्यासाठी एकूण 672 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. मतमोजणी 21 ठिकाणी असणाऱ्या केंद्रांवर होणार आहे. मतमोजणीसाठी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.