दिल्ली प्रदुषितच!

10 मायक्रोमीटर व्यासाच्या कणांचे प्रमाण वाढले
नवी दिल्ली : दिल्ली राजधानी परिसरातील अनेक भागात हवेचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे नोंदीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या नोंदीत 10 मायक्रोमीटर व्यासाच्या कणांचे प्रमाण हवेत जास्त प्रमाणात असल्यचे दिसून आले आहे.

दिल्लीचा हवा दर्जा निर्देशांक 299 होता तो खराब दर्जाकडे झुकणारा आहे. मंगळवारी हा निर्देशांक सायंकाळी चार वाजता 270 होता. एकूण 37 हवा निरीक्षण केंद्रांच्या माहितीनुसार दिल्ली राजधानी परिसरात हवेची स्थिती खूप खराब दर्जाची होती.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले की, मुंडका, द्वारका सेक्‍टर 8, दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ, आनंद विहार, वझीरपूर, रोहिणी, बवाना, अशोक विहार, नेहरू नगर व जहॉंगीरपुरी भागात हवा निर्देशांक हा अनुक्रमे 368, 362, 355, 328, 323, 323, 320, 319, 319, 318 होता. अलिपूर (314), नरेला (312), विवेक विहार (311), सिरीफोर्ट (309), सीआरआरआय मथुरा रोड ( 304), ओखला फेज 2 (303), आयटीओ (302) याप्रमाणे निर्देशांकाची नोंद झाली.

गाझियाबाद (337), लोणी देहात (335), नोईडा (318), बृह नोईडा ( 318), या प्रमाणे इतर ठिकाणीही प्रदूषण गंभीर स्वरूपात होते. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रीसर्च म्हणजे सफर या संस्थेने म्हटले आहे की, भाताच्या काढणीनंतर पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. बुधवारी यामुळेच पीएम 2.5 कणांचे प्रमाण वाढण्यात पिकांचे अवशेष जाळण्याचा सहा टक्के वाटा होता. नासाने दिलेल्या छायाचित्रातही पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटना दिसून आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.