नवी दिल्ली, दि. 24-“बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे शोषण करण्याची एकही संधी सोडली नाही.’ तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरसे पुरावे असल्याचा युक्तिवाद दिल्ली पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी हरजीत सिंग जसपाल यांच्यासमोर केला.
भाजपचे खासदार असणाऱ्या बृजभूषण यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी एक दिवसाची सूट देखील न्यायालयाकडून देण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध ताजिकिस्तानमधील काही घटनांचा हवाला कोर्टात दिला. तसेच या घटना त्यांच्या कृती प्रतिबिंबित करतात असा दावा देखील कोर्टात केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बृजभूषण सिंह यांनी एक महिला कुस्तीपटूला जबरदस्तीने मिठी मारली आणि त्यानंतर ही मिठी वडिलांप्रमाणे असे सांगत त्यांच्या कृत्याचे समर्थन केले होते.
तसेच, ताजिकिस्तानमधील आशियाई चॅम्पियनशिप दरम्यान बृजभूषण यांनी परवानगीशिवाय महिला कुस्तीपटूचा शर्ट उचलला आणि तिच्या पोटाला अनुचित रित्या स्पर्श केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तसेच, या घटना भारताबाहेर जरी घडल्या असल्या तरी त्यांच्या या प्रकरणाशी संबंध असल्याचा युक्तिवाद दिल्ली पोलिसांनी यावेळी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सविस्तर सुनावणी ही 7 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.