स्वच्छ सर्वेक्षणात देहूरोड कॅंटोन्मेंट राज्यात अव्वल

केंद्रात आठवा क्रमांक : सीईओ रामस्वरूप हरितवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

देहूरोड – केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सलग तीन वर्षे भाग घेणाऱ्या आणि गतवर्षी देशात 40 व्या स्थानावर असलेल्या देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने यंदा सामूहिक प्रयत्न केले, तसेच त्रुटी दूर करीत राज्यात प्रथम तर देशात आठवा पुरस्कार मिळवल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वच्छ सर्वेक्षणात कॅंटोन्मेंटला मिळालेल्या पुरस्काराची माहिती देण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेला उपाध्यक्ष रघुवीर शेलार, नगरसेवक विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमुत्तू, ऍड. अरुणा पिंजण, सारिका नाईकनवरे, आरोग्य निरीक्षक किरण गोंटे, एम. सय्यद आदी यावेळी उपस्थित होते.

देशातील 62 कॅंटोन्मेंट बोर्डांचा स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये प्रथमच झाला होता. राज्यातील सात कॅंटोन्मेंट बोर्ड या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. त्यावेळी झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात तीन टप्प्यात गुणांकन करण्यात आले होते. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाला 4 हजार गुणांपैकी फक्‍त 2 हजार 243 मिळाल्याने बोर्डाचा 15 वा क्रमांक आला होता. दुसऱ्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देहूरोड कॅंटोन्मेंट 40 व्या स्थानावर घसरले होते. तसेच राज्यात देहूरोड कॅंटोन्मेंट शेवटच्या स्थानी होते. कॅंटोन्मेंट बोर्डाला 5 हजार गुणांपैकी अवघे 1 हजार 742 गुण मिळाले होते.

यंदा स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाला 6 हजार गुणांपैकी 2942.98 गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 1200 गुण अधिक मिळाले असून, क्रमवारीतील 40 व्या स्थानावरून 8 व्या स्थानावर व राज्यात शेवटच्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतल्याने संबंधित यंत्रणेने देशातील “फास्टेस्ट मूवर’ कॅंटोन्मेंट बोर्डाचा प्रथम पुरस्कार देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाला दिला असल्याचे सांगण्यात आले.

सीईओ हरितवाल म्हणाले की, वारंवार संबंधितांच्या बैठका, आरोग्य विभागातील कामाची पद्धत, कचरा व्यवस्थापन, घंटा गाडीद्वारे घरोघरी गोळा करण्यात येणारा कचरा, सुलभ शौचालय, खत प्रकल्प, उद्यान, जीम व्यवस्था आदीची दखल घेण्यात आली. नागरिकांनी स्वच्छतेबाबत केलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात यश आले. आरोग्य सुविधा पुरविण्यात सुधारणा केल्याने गुण वाढले आहेत. तसेच सर्वेक्षणात आवश्‍यक कागदपत्र सादरीकरण व्यवस्थित झाल्याने यश प्राप्त झाले आहे.

खरे कौतुक सफाई कामगारांचे…
स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाला राज्यात प्रथम आणि देशात आठवा क्रमांकवर नेण्याचे खरे काम सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे यश आहे. त्यामुळे खरे कौतुक सफाई कामगारांचेच आहे. नगरसेवक विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमुत्तू, ऍड. अरुणा पिंजण यांनी व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.